३ नोव्हेंबर २०१९ ठळक घडामोडी (चालू घडामोडी)
1) जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांना ‘इटालियन गोल्डन सॅण्ड आर्ट पुरस्कार 2019’ जाहीर झाला असून तो इटलीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्कोराना सॅण्ड नेटिव्हीटी कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पटनाईक भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
2)हरियाणाच्या काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा यांची नेमणूक करण्यात आली असून ते विधिमंडळात विरोधी पक्षनेते असतील.
3) 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 (IFFI 2019) गोवा येथे आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना प्रतिष्ठेचा ‘आयकॉन ऑफ द गोल्डन ज्युबिली आयएफएफआय 2019’ या सन्मानाने गौरवले जाणार आहे. त्याचबरोबर फ्रेंच अभिनेत्री इसाबेल हुपर्ट यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
देश विदेशांतील 50 महिला चित्रपट निर्मात्यांच्या 50 चित्रपटांच्या प्रदर्शनाचे खास दालन हे या चित्रपट महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे.
4) भारत दौऱ्यावर असलेल्या जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी दिल्ली येथील प्रसिद्ध जामा मशिदीला भेट दिली. ग्रीन अर्बन मोबिलिटी अंतर्गत येत्या 5 वर्षात भारतात 5 अब्ज युरोची (8 हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तामिळनाडू मधील बससेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी जर्मनी 20 कोटी युरोची मदत करणार आहे.
5) जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना सामाजिक एकता, मराठी साहित्य-संस्कृती, कला आदी क्षेत्रात लक्षणीय कामगिरीसाठी दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. चव्हाण यांच्या स्मृतिदिनी 25 नोव्हेंबरला कऱ्हाड येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मानपत्र आणि 2 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. एन. डी. पाटील हे 18 वर्षे विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यांनी 2 वर्षे सहकार मंत्री म्हणूनही काम केले होते.
6) मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार गुरू नानक देव यांच्या 550 व्या जयंतीवर्षा निमित्त ‘शीख संग्रहालय आणि संशोधन केंद्र’ उभारणार आहे. शीख धर्माशी संबंधित 6 धार्मिक स्थळांचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्यात येणार आहे.
Discussion about this post